सदानंद चांदेकर, मकरंद टिल्लू, दिलीप हल्याळ, विश्‍वास पटवर्धन, म्हाळसाकांत कौसडीकर यांचा दमदार सहभाग
 
एमपीसी न्यूज – 28 व्या ‘पुणे फेस्टिवल’चे प्रमुख आकर्षण असलेला ‘एकपात्री कलाकारांचा हास्योत्सवा’ मध्ये सोमवारी हशा-टाळ्यांची बरसात झाली. त्यामुळे बालगंधर्व रंगमंदिर रसिकांच्या प्रतिसादाने दणाणून गेले. 
 
 
नामवंत ज्येष्ठ एकपात्री कलाकार सदानंद चांदेकर, विश्‍वास पटवर्धन, दिलीप हल्याळ, महेंद्र गणपुले, मकरंद टिल्लू  यांच्यासमवेत म्हाळसाकांत कौसडीकर या नवोदित कलाकारांनीही रसिकांची मने जिंकली. ‘हसायदान फाऊंडेशन’च्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
एकपात्री कलाकारांना समाजात मिळणारा चित्रविचित्र प्रतिसाद, कार्यक्रमादरम्यान येणारे चाहत्यांचे गमतीदार अनुभव आणि शाळू सोबत्यांचे किस्से सांगून सदानंद चांदेकर यांनी सभागृह डोक्यावर घेतले. ‘आनंद वाटत जगणे हेच श्रेष्ठ जगणे’ असा संदेशही त्यांनी दिला.
‘हसण्यामुळे कलाकार लठ्ठ होतो, आणि हसताना प्रेक्षक सुंदर दिसतात’ असे सांगत दिलीप हल्याळ यांनी घरातील सदस्यांसह अनेक किस्से, विनोद सांगून दाद मिळविली.
‘आवाजांचा बादशहा’ असलेल्या महेंद्र गणपुले यांनी सनई वादनाचा मंगल आवाजापासून सुरुवात करून बप्पी लहरींच्या डिस्को ड्रमपर्यंत अनेक आवाज हुबेहूब काढून रसिकांना चकीत केले. चित्रपटांची गमतीशीर नावे, गाण्यातील अर्थहीन शब्द अशा अनेक विसंगतींवर बोट ठेवत त्यांनी मनोरंजन केले.
युवा एकपात्री कलाकार म्हाळसाकांत कौसडीकर यांनी मराठवाड्यातील लग्नघरी घडणार्‍या गमतीशीर प्रसंगांना स्त्री-पुरुष अशा दोन्ही भूमिकातून जिवंत केले. सदानंद चांदेकर यांनी त्याला रोख बक्षीस दिले. विश्‍वास पटवर्धन यांनी राशींच्या, व्यक्तींच्या गमतीजमती सांगितल्या. मकरंद टिल्लू यांनी खुमासदार सूत्रसंचालन करून रसिकांची मने जिंकली. मोहन टिल्लू यांनी आभार मानले.
ac6903f6038d7f4f30ca2d4aee05487b_l

admin

Comments are closed.